पुणे : भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि धावांनी पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव ९१ धावातच संपुष्टात आला. भारताकडून अश्विनने ३७ धावात ५ विकेट्स घेतल्या. तर जडेजाने आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ४०० धावात संपुष्टात आला. रोहित शर्माने सर्वाधिक १२० धावा तर अक्षर पटेलने ८४ आणि रविंद्र जडेजाने ७० धावांचे योगदान दिले.
भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे मोठी धावसंख्या उभी करतील असे वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे झाली नाही. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या पिचवर जडेजा तिसऱ्या दिवसातील ५व्या ओव्हरमध्ये बाद झाला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या टॉड मर्फीने जडेजाला बोल्ड केले. ऑफ स्पिनर मर्फीचा चेंडू जडेजाला कळालाच नाही.
दरम्यान, जडेजाला वाटले मर्फीचा चेंडू पिचवर पडल्यानंतर वळेल, त्यामुळे त्याने बॅट वर उचलली आणि चेंडू सोडून दिला. मात्र मर्फीचा चेंडू पिचवर पडला आणि थेट ऑफ स्टंपवर गेला. यामुळे ७० धावांची शानदार खेळी करणाऱ्या जडेजाला माघारी जावे लागले. त्याने १८९ चेंडूत ९ चौकार मारले.