उरुळी कांचन, (पुणे) : “देशांमध्ये मुलींच्या शिक्षणावर अधिक भर द्यावा जेणेकरून मुली भविष्यात स्वकर्तुत्वावर उभा राहतील व समाजांच्या अनेक विधायक बदलांच्या करता त्यांचे मोठे योगदान राहील.” तसेच शाळेतील विद्यार्थी या पायाभूत प्रकल्पाच्या मदतीने उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त करून नक्कीच स्वतःचा व देशाचा विकास घडवून आणतील, असे मत भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक गजाजन उपाध्याय यांनी व्यक्त केले.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ, मुंबई यांच्या सीएसआर निधी अंतर्गत व भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे. यासाठी दोन वर्गखोल्या व विद्यार्थीनींचे मासिक व दैनंदिन स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यांचे उद्घाटन गजाजन उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्याय बोलत होते. यावेळी गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा महाडीक ह्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक नितेश भीमटे, बी. पी. सी. एल.चे मुख्य व्यवस्थापक दिपायण रॉय, संतोष भावे, संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश कांचन, पत्रकार अमोल भोसले, भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, अमित खंडाळे, तंत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना गजाजन उपाध्याय म्हणाले, “या प्रकल्पाच्या मदतीने विद्यार्थी नक्कीच चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊ शकतील व शाळेतील विद्यार्थिनी त्यांचे आरोग्य चांगले ठेवू शकतील, अशी मला आशा आहे व जीआयसीरे चा सहयोग हा बीबीकेजीएसएस. संस्थेला व शाळेला नक्कीच राहील असे आश्वासन दिले.
प्रकल्प संचालक प्रकाश जगताप म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना फक्त शिक्षण घेऊ नये तर त्यासोबत आपण स्वतःतील कलागुणांना पारंपारिक व्यवसायांना देखील वाव दिला पाहिजे. भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ, मुंबई व बी. पी. सी. एल. (तरडे) हवेली कंपनी मार्फत नेहमीच पायाभूत प्रकल्पाचे नेहमीच कौतुकास्पद कार्य होत असते. असेच सहकार्य संस्थेला कायम लाभले तर आम्ही नक्कीच या परिसराचा कायापालट करून दाखवू.”
दरम्यान, प्रमुख अतिथी दिपायण रॉय, नितेश भीमटे, कार्यक्रम अध्यक्षा उषा महाडिक, शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याधापक सुरेश कांचन यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे यांनी केले.
सुत्रसंचालन लांडे सर व आभार प्रदर्शन विकास कुंजीर यांनी केले. या कार्यक्रमासाठी भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे कर्मचारी शेखर मरकड, महेश नेवसे, व अक्षय राऊत, शाळेतील शिक्षक, आजी- माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.