पुणे : राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. आज विधानभवनात विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.
यावेळी अजित पवारांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आशिष शेलार उपस्थित होते.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली होती. मात्र, तरीही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घ्यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे.