राहुलकुमार अवचट
यवत (दौंड) : दौंड तालुक्यातील पारगाव व जिरेगाव येथील खुनाची प्रकरणे ताजी असतानाच वरवंड (ता. दौंड) येथे एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करीत निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
हुसेन अल्लीसो तांबोळी (वय ६०, वरवंड, ता दौंड जि. पुणे) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन तांबोळी हे पती – पत्नी लोकवस्ती वरवंड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ठिकाणी दोघेच घरी राहतात. पहाटे लोकवस्तीत असलेल्या घरासमोरच हुसेन तांबोळी हे बेशुद्ध अवस्थेत निपचित पडलेले आढळून आले. त्याच्याकडे नीट पाहणी केली असता त्यांचा अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची ग्रामस्थांनी तात्काळ यवत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, स्वप्निल लोखंडे लोखंडे यांसह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे, याचा तपास यवत पोलीस करीत असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.