दौंड : दौंड शहरातील खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेला तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह एकूण नऊ संशयितांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर यातील दोन जणांना अटक केली आहे.
विशाल दुमावत (वय ३७, रा. पंचायत समिती समोर, दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल पळसे (वय २६, रा. महात्मा गांधी चौक) व रवी सॅमसन गायकवाड (वय ३४, रा. गोवा गल्ली, दौंड असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दौंड शहरातील भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भांड्याचे व्यापारी विशाल दुमावत याने २९ जानेवारी रोजी सकाळी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने मागील चार वर्षात दुकानासाठी नऊ खासगी सावकारांकडून मासिक १० ते २० टक्के व्याजदराने तब्बल पंचवीस लाख रुपये घेतले होते.
मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधित सावकार दुकानात येऊन दमदाटी आणि शिवीगाळ करीत आणखी पैशांची मागणी करीत होते. त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. शनिवारी (ता. ४) रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे .विशाल याच्या पत्नीने दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांसह एकूण नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर यातील दोन जणांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.