पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपाने हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटद्वारे दिली. यामुळे आता कसब्यातून हेमंत रासने व रवींद्र धंगेकर अशी थेट लढत होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना कसब्यातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार हे गुलदस्त्यात होते. मात्र या शर्यतीत अनेक नावे पुढे येत असताना रवींद्र धंगेकर यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केले. काँग्रेसच्या परंपरागत असलेल्या कसबा मतदारसंघातून धंगेकर हे हेमंत रासने यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून मनसेत गेलेले रवींद्र धंगेकर हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी दोन वेळा मनसेकडून नगरसेवक होते. त्यापूर्वी ते शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कसब्याचे माजी आमदार व विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून धंगेकर यांची प्रतिमा आहे. सन २००९ साली झालेल्या निवडणुकीत गिरीश बापट व रवींद्र धंगेकर यांच्यात केवळ ७ हजार मतांचेच अंतर होते.