पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला तत्वतः मंजुरी दिल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही घटना शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी उत्साहवर्धक आहे. मात्र हा प्रकल्प ब्रॉडगेजवरच व्हायला हवा, अशी माझी भूमिका असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यादृष्टीने लक्ष घालावे. मात्र या महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मनापासून आभार मानले आहेत.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला तत्वतः मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट केले असले तरी यात अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात, असेही अमोल कोल्हे यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, मुख्य म्हणजे ही रेल्वे ब्रॉडगेजवरच होणार का? हा अत्यंत महत्त्वाचा व कळीचा प्रश्न आहे. कारण जर ब्रॉडगेजवर होणार असेल तर आणि तरच या सर्व भागातील शेतकऱ्यांना, उद्योगांना या रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यामुळे जी तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे ती, सादर केलेल्या मूळ प्रकल्पाला आहे की त्यात काही बदल करण्यात आला आहे, याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्यांनी दिलं तर नक्कीच फायदा होईल असंही खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात शिरुर लोकसभा मतदारसंघातील शेतमाल व औद्योगिक मालवाहतूक करता येईल, परिणामी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून येथील अर्थकारणाला नवी दिशा मिळेल अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे सातत्याने मांडत आहेत.
मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील खासदारांच्या बैठकीतही डॉ. कोल्हे यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळावी आणि हा प्रकल्प ब्रॉडगेजवरच व्हायला हवा अशी आग्रही भूमिका मांडली होती.
याबाबत बोलताना खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने या प्रकल्पाला गती दिली, त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प पुढे नेला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही धन्यवाद देतो. असे कोल्हे म्हणाले आहेत.