पुणे : घराबाहेर पडताना एकमेकांची सोय व्हावी, यासाठी घराच्या कुलूपाची चावी खिडकीत लपवून ठेवणे ही सवय नारायण पेठेतील येथील महिलेला चांगलीच महागात पडली आहे. खिडकीत ठेवलेल्या चावीचा वापर करुन अज्ञात चोरट्याने ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. ०५) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वैष्णवी अपार्टमेंट येथे राहतात. त्या चार फेब्रुवारीला घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी जाताना त्यांनी घराबाहेरील खिडकीबाहेर चावी ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी खिडकीवर ठेवलेली त्यांची चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला.
त्यानंतर घरात प्रवेश करून लोखंडी कपाट आणि कपाटातील ड्रॉवर उचकटून त्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पाचशे किमतीचे चांदीचे तोडे, असा ऐवज चोरून नेला.
शहरात नारायण पेठेसह कोथरूड, नऱ्हे, हडपसर आणि कोंढवा येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केल्याच्या एकूण सात घटना शनिवारी घडल्या. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नऱ्हे येथील मल्हार हाइट्समध्ये दोन फेब्रुवारीला बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख १३ हजारांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार महिला कुटुंबीयांसह दोन फेब्रुवारीला कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी तेथे घरफोडी केली. धायरी परिसरातील आंबामाता रस्त्यावरील ओंकार सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ड्रॉवरमधील ९० हजार रुपयांची रोकड चोरली.
कोथरूडमधील अवंती सोसायटीतील बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना एक ते दोन फेब्रुवारीला घडली. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार कुटुंबीयांसह राहतात. ते एक आणि दोन फेब्रुवारीला कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.
त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख ८४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ते गावाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिस तपास करीत आहेत.
दरम्यान, कोंढव्यातील भाग्योदयनगर येथे घरफोडी करून भरदिवसा एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. फुरसुंगी येथील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घड्याळे, चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरला.