पुणे : खराडीत नवीन बांधकाम साईटवर पाया खोदताना सुरूंग लावून जिलेटीनचा स्फोट घडविल्यानंतर स्फोटात एका मजूराजाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरा कामगार गंभीररित्या जखमी झाला असून, महिला कामगार किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (ता.२) सकाळी साडे दहाच्या सुमारास मे. प्लॅनेज कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या साईटवर घडली.
कादीर रमेश शेख (वय.२३, रा. लेबर कॅम्प, खराडी) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. नोरेश मनुचौधरी गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. तर, सचिन दिलीप आटपाडकर (वय ३८, रा. घोटावडे. ता. मुळशी), गौतम मंडल (वय.३६) आणि दिपक मार्सकोले (वय.२३) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके (वय. ३३) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील सर्व्हे नंबर ६९/४ येथे मे. प्लॅनेज कंस्ट्रक्शन प्रा. ली.च्या नवीन बांधकाम साईटचे कामकाज सुरू होते. इमारतीचा पाया खोदकाम सुरू असल्याने मजूर देखील तेथे काम करत होते.
त्याठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी सुरुंग पाडण्याचे काम सचिन आटपाडकर यांना देण्यात आले होते. त्यासाठी त्यांची रीतसर परवानगी देखील घेतली होती. यावेळी जिलेटीन लावून स्फोट करण्यात आला. या स्फोटानंतर दगड उडून कामगार कादिर शेख यांना लागले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर नौरेश व इतर महिला कामगार दगड लागल्याने जखमी झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.