पुणे : इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून गाईंची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २५ लाख २० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोशीन बाबू कुरेशी (वय. २८), शाहिद रहेमान कुरेशी (वय. ४२), मोहम्मद अब्दुल रहमान कुरेशी (वय. २०), आशराफ सलमान कुरेशी (वय. ३२), मोहम्मद आरिफ सलमान कुरेशी (वय. ५२), सोहेल फारूक कुरेशी (वय .३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गायींना बेशुद्ध करत त्यांना कत्तलीसाठी नेण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना (२८ डिसेंबर) रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंबर प्लेट नसलेली कार संशयितरित्या फिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला असता आरोपी गाडी सोडून पळून गेले.
त्यानंतर गाडीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी गाडीच्या इंजिनाच्या नंबरवरुन गाडी मालकाचा शोध घेतला. त्यावेळी ही गाडी अशोक जगताप यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडे तपास केला असता ही गाडी सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्री झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, ही गाडी मोशीन कुरेशी यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोशीन बाबू कुरेशी याचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्यावरून त्यांच्या साथीदारचे मोबाईल नंबर प्राप्त केले. तसेच नंबरचे सीडीआर, घटनास्थळ व घटनास्थळाचा परीसरातील डम्प डाटा विश्लेषण करून करून आरोपींचा मीरारोड काशिमीरा माहीम येथे शोध घेऊन आरोपींना अटक केली.
आरोपींकडून तीन मोटार कार एन्जॉय, इनोव्हा, महिंद्रा एसयूव्ही तसेच गुन्ह्यात वापरलेले कोयते, सत्तुर, नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन औषधाची बाटली नंबर प्लेट असा एकूण २५ लाख २० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.