लोणावळा : लोणावळ्यातील विस्प्रिरिंग वुड या आलिशान हॉटेलमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व त्यांच्या पथकाने धाड टाकली असता, हॉटेलमध्ये ९ महिलांसह ४४ जण न्यूड डान्स करताना सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी ५३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वलवण गावातील विस्प्रिरिंग वुड या हॉटेल मध्ये काही इसम व महिला साऊंड सिस्टीमच्या मोठया आवाजावर न्यूड डान्स व अश्लीश चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह विस्प्रिरिंग वुड हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी ९ महिलांसह ४४ जण अश्लीश गाण्यावर न्यूड डान्स करताना सापडले आहेत. पोलिसांनी साऊंड सिस्टिम जप्त केली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५३ जणांवर आयपीसी २९४, ३४ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.