“अर्थसंकल्प हा लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला ‘चुनावी जुमला’ – अजित पवार ; लोणी काळभोर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन..!
लोणी काळभोर, (पुणे) : “लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प आहे. सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही आलेले दिसत नाही, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा ‘चुनावी जुमला’ असणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लोणी काळभोर येथे केला आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदार पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार होते.
यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, विलास आण्णा काळभोर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप आण्णा गायकवाड, सुनंदा शेलार, पुणे जिल्हा कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, योगेश काळभोर, सदस्य भरत काळभोर, नागेश काळभोर, प्रियंका काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर, सुभाष टिळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे लक्ष केंद्रित झालेल्या आणि पक्षीय पातळीवर प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला झाला असून भाजपला विचार करायला लावणारा निकाल आहे. तसा सत्ताधारी पक्षाला ज्यांनी गद्दारी करून सहा सात महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार बाजूला केलं त्या लोकांना तर डोळ्यात अंजन घालणार निकाल पदवीधर लोकांनी दिला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राचा मूढ एका सर्व्हेतून समोर आल्यानंतर फडणवीस- शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची परिस्थिती बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाची सर्व तयारी झाली होती. मात्र शिवसेनेचा बाबा फुटला व गुवाहाटीला जाऊन बसला त्यामुळे सर्व नियोजन फिस्कटले असे म्हणताच एकच हशा झाला.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नको..!
शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला झाला आहे. त्यामुळे आता जर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या तर त्याचा अंदाज आताच्या सरकारला चांगलाच आला आहे. त्यामुळे या निवडणुका आणखी लांबवणार यात कोणतीही शंका नाही.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे कौतुक..!
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत बनविलेल्या सिमेंट रोड, तसेच गावात जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवून त्यावरती लावलेली झाडे रस्त्याचे केलेले काम यची अजित दादांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी केलेल्या कामाचे कौतुक अजित पवार यांनी जाहीर सभेत केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी तर आभार माजी उपसरपंच योगेश काळभोर यांनी मानले.