लोणी काळभोर, (पुणे) : नात्यातील तरुणीला पळवून तिच्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाच्या बहिणीचे अपहरण केले. तसेच तिला विवस्त्र व अमानुष मारहाण करून तिची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याची निंदनीय घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (रा. सर्वजन उरुळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील एका तरुणीला तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा आरोपींना संशय होता. या संशयावरून आरोपींनी तक्रारदार आणि तिच्या २४ वर्षीय बहिणीचे अपहरण केले.
या संशयावरून आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. मात्र ते सांगण्यास दोघींनी ठाम नकार दिला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी या दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.
दरम्यान, त्याचा राग मनात धरून आरोपींनी या दोघींना गजाने मारहाण केली. त्यानंतर बहिणीला विवस्त्र करुन खोलीत डांबून ठेवून मोबाइलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. या आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे तपास करत आहेत.