पुणे : हडपसर येथील कोयता गँगमधील ७ अल्पवयीन मुले येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. तर अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एकाच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष किसन कुंभार (वय ४६) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर व मांजरी परिसरात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या सात अल्पवयीन मुलांविरोधात हडपसर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर बालन्याय मंडळाच्या आदेशाने अल्पवयीन मुलांची रवानगी येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील निरीक्षणगृहात पाठविण्यात आले होते.
दरम्यान, अल्पवयीन मुले निरीक्षण गृहातील सीमाभिंतीवर शिडी लावून चढले. भिंतीवरून उड्या मारून पसार झाले. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे. तर अल्पवयीन मुलांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या एकाच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.