पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर उर्से गावाच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी गोवा बनावटीची दारु जप्त करून दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या तळेगाव दाभाडे विभागाने केली आहे. या कारवाईमध्ये ६२ लाख ६८ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय. २५, व्यवसाय ट्रक चालक रा, ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात) मोहन दिनराम खथात, (वय.34,व्यवसाय-ट्रक क्लिनर रा. रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. २७) रोजी राज्य उत्पादन शुल्कालकाने उर्से टोल नाक्यावर शुक्रवारी सापळा रचून अवजड वाहनांची तपासणी केली. तेव्हा त्यांना एका कंटेनरमध्ये आठशे बॉक्स आढळले. त्यात ४३ हजार दोनशे रॉयल ब्लु माल्टच्या बॉटल आढळल्या. कंटेनर भरून मद्याचा साठा जप्त करून त्यांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
गोवा राज्य निर्मित आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरता हा गोवा बनावट मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. आरोपी सिंगाभाई गुजरातचा तर, मोहन खताथ हा राजस्थानमधील असल्यामुळे या टोळीचा गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र असे ‘कनेक्शन’ असल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाला आहे.