राहुलकुमार अवचट
यवत : पारगाव येथील भीमा नदीत सात व्यक्तींची हत्या करून फेकून दिले होते. या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. येथे १८ ते २४ जानेवारीच्या दरम्यान सात जनांचे मृतदेह मिळाले होते, त्यानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना ५ जणांना अटक केली आहे.
चुलत भाऊ व बहिणीने बदल्याच्या भावनेतून सात जणांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शवविच्छेदन अहवालानंतर दुसऱ्या छाननी करण्यात येणार आहेत. आरोग्य खात्याकडून त्रुटीच्या संदर्भातील उत्तरे घेण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार फॉरेन्सिकची देखील मदत घेण्यात येणार आहे, असे महानिरीक्षक फुलारी यांनी स्पष्ट केले.
तसेच एकंदरित घटनाक्रम, त्याच्या व त्यातील सुसंगती यांची बारकाईने छाननी करण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले. तसेच व्हिसेरा व पूर्ण तपासणी अहवाल काहीच दिवसात प्राप्त होतील. आरोपीना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीना कुणी मदत केली का याची देखील पडताळणी करण्यात येणार आहे.
या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली वाहणे देखील ताब्यात घेण्यात आली असून इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आदी उपस्थित होते.