पुणे : पुणे शहरातील अनेक भागात कोयते हातात घेऊन नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आठ ते नऊ ग्रुपला अटक केली असून या सर्वांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, पुणे शहरात अनेक भागात कोयते हातात घेऊन नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे. या आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी आठ ते नऊ ग्रुपला अटक केली आहे.
या सर्वांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता यामधून एकजण देखील सुटणार नाही. तसेच ज्यावेळी ४० ते ५० जणांना मोक्का लागेल, आयुष्य उध्वस्त होईल त्यावेळी इतरांना हा धडा मिळेल. असे त्यांनी बोलताना सांगितले.
कोयता गँगने यापूर्वी देखील शहराच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. अनेकदा थेट रस्त्यावर दहशत देखील पसरवली आहे. त्यामुळे या गँगच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
तरी देखील या गँगची दहशत कमी होत नाही. त्यामुळे पोलीसांनी खंबीर पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.