सोलापूर : तिरुपती बालाजी येथून देवदर्शन घेऊन परत निघालेल्या सोलापुरातील तरुणांच्या चारचाकी गाडीने डीव्हायडरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंद्रगिरी मंडलातील नायडूपेठ-पूथलापडू या मुख्य महामार्गावर घडली आहे.
अंतर अनंत टेंबूकर, मयुर मुत्तन, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे (रा. सर्व जानकी नगर, जुळे सोलापुर, सोलापूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. अपघात इतका भीषण होता की टवेरा वाहनाचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह बाहेर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जुळे सोलापुरातील जानकी नगर या एकाच गल्लीत सर्व मित्रांचे घर आहे. व्हीव्हीपी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून या तरुणांनी शिक्षण पूर्ण केले आहे. दरवर्षी हे मित्र आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात होते. २३ जानेवारीला देखील या सर्व मित्रांनी बालाजीला जाण्याचे नियोजन केले होते. टवेरा कार घेऊन ते निघाले आणि सुखरूप बालाजीला पोहोचले होते.
दर्शन घेऊन परत येताना भरधाव वेगातील चारचाकी ही गाडी डीव्हायडरला धडकली. या अपघातात वाहनात समोरील बाजूस बसलेले चौघे मित्र जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती येथील रुईया रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेबाबत कळताच सोलापुरातील मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक तिरुपतीकडे रवाना झाले. या अपघाताने गुरुवारी दिवसभर जानकी नगर परिसरात शोककळा पसरली होती