दीपक खिलारे
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी दि.२५ मुंबई येथे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांचेसह इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माजी पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे, वरकुटे बुद्रुक गावचे माजी सरपंच नामदेव बनकर, बेलवाडी येथील युवा नेते वैभव जामदार, भिगवण येथील नवनाथ सुतार, निमगाव केतकी येथील देविदास भोंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
आगामी काळात तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिंदे गटाचे खा. राहुल शेवाळे, राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह अनेक आमदार, खासदार व नगरसेवक उपस्थित होते.