राहुलकुमार अवचट
यवत : राष्ट्रीय महामार्ग ९ अर्थात पुणे सोलापूर महामार्गावरील व ५४८ डीजे न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या विविध समस्या आता लवकरच मार्गी लाहणार आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी (ता.२४) दिल्ली येथे भेट घेतली आहे. त्यावेळी या रस्त्याच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास, भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत. या महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम पूर्ण करावे. तसेच वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास उभारण्यात यावा. अशा मागण्या आमदार कुल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केल्या.
याबरोबरच न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता हा रस्ता पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग NH- 548 DG घोषित करण्यात आले असून सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेण्यात यावे. अशीही मागणी कुल यांनी गडकरी यांना केली आहे.
दरम्यान, पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याबाबत नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देशही गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.