लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारला. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने ही कारवाई सोमवारी (ता.२३) केली आहे.
वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ६४६ वरील G+० (पत्रा शेड ) व्यावसायिक स्वरूपाचे सुमारे ५०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम व ५०० फुट लांब अनधिकृत भिंतींचे बांधकाम ३ पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले व वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यात आला.
सदर वाणिज्य स्वरूपाचे बांधकाम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या मूळ मंजुरी व्यतिरिक्त ॲम्युनिटी स्पेस (सुविधा जागा) मध्ये अनधिकृतपणे वाढीव बांधकाम करण्यात आले होते. यावेळी पीएमआरडीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,
पीएमआरडीए कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकतधारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अन्यथा विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र राबविली जाणार आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासनाचा खर्च देखील मिळकतधारकाकडून वसूल केला जाणार आहे, असे पीएमआरडीएने स्पष्ट केले आहे.