विशाल कदम
लोणी काळभोर : जेजुरी- सासवड रस्त्यावरील बेलसर (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी नारायण लॉजिंगवर खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे.
जेजुरी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून लॉजवर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. तर लॉज व्यवस्थापकाला अटक केली आहे.
रामा नारायण मोगाविरा (वय ३८,रा. हॉटेल जय भवानी, सासवड रोड, वडकी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,(१),५,७ (अ) प्रमाणे जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी- सासवड रस्त्यावरील बेलसर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या लक्ष्मी नारायण लॉजवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले. आणि सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास लॉजवर पाठवले.
दरम्यान, बनावट ग्राहकाला खात्री झाल्यानंतर त्याने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगाल मधील दोन मुलींची सुटका केली. तर लॉज व्यवस्थापक रामा मोगाविरा याला ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर करत आहेत.
ही कामगिरी जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलिस हवालदार नंदकुमार पिंगळे, पोलिस हवालदार एन. आर. दोरके आणि पोलिस नाईक गणेश नांदे यांच्या पथकाने केली आहे.