पुणे : अमरावती मध्यवर्ती कारागृहात पुण्यातील ८ कैद्यांनी राडा घातला असून दोघा कैद्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कारागृहाचे सुभेदार एएसआय प्रल्हाद इंगळे यांनी फ्रेजरपूरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अजय घाडगे, अक्षय सोनसे, आकाश मिरे, आशिष डाकले, अर्जुन मस्के, प्रज्योत पांडुरंग, अभिषेक खोड व अमीर मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे हे दोघे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तर येरवडा कारागृहातून ८ कैद्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. यावेळी येरवडा कारागृहातून आलेल्या ८ कैद्यांनी ऋषिकेश मोडक व अर्जुन घुगे यांना अश्लील शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.
दरम्यान, ते मारहाण करत असल्याचे दिसताच तेथील दोन कर्मचार्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी ऐकले नाही व मारहाण सुरुच ठेवली. तेव्हा या कर्मचार्यांनी शिटी वाजवून कारागृहातील इतर कर्मचारी व अधिकार्यांना बोलविले. अन्य कर्मचारी आल्यानंतर त्यांनी बळाचा सौम्य वापर करुन हा वाद सोडविला. तसेच याप्रकरणी ८ कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.