आकुर्डी : ”तुझी बहिण बॉयफ्रेंडसोबत फिरतेय”, असे मित्राला सांगितले. याचा राग मनात धरून चिडलेल्या बॉयफ्रेंडने प्रेयसीच्या भावाच्या मित्रावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना आकुर्डी येथील डी.वाय. पाटील कॉलेजच्या समोरील रस्त्यावर शनिवारी (ता.२१) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे.
अनिकेत गोरे (वय-१९, रा. चिंचवड) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर यशराज शेलार (वय अंदाजे -२२, रा. आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये शनिवारी (ता.२१) रात्री वार्षिक स्नेह संमेलन (गॅदरिंग) होते. त्यामुळे जास्त विद्यार्थी जमले होते. यशराज शेलारची प्रेयसी ही तेथे आली होती. यशराजच्या प्रेयसीचा भाऊ हा अनिकेत गोरेचा मित्र आहे.
अनिकेत सुद्धा तेथे आला होता. अनिकेतने यशराज व त्याची प्रेयसी अर्थात मित्राच्या बहिणीला एकत्र पहिले. त्यानंतर अनिकेतने त्याच्या मित्राला म्हणजेच यशराजच्या प्रेयसीच्या भावाला सांगितले. याचा राग मनात धरून आरोपी यशराजने अनिकेतवर कॉलेज कॅम्पसच्या बाहेर रस्त्याच्या कडेला कट्ट्याजवळ चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात गोरे हा किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपी फरार झाला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.