पुणे : सिंहगडावरील कचरा प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या मशिनरी चोरीची उकल करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले असून, सिंहगडावर खाद्यपदार्थ विक्रेताच या चोरीचा ‘मास्टर माईंड’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी ३ आरोपी फरार आहेत.
सुनिल शिवाजी चव्हाण (वय – २३ रा. मोरदरी ता. हवेली), आकाश काळुराम चव्हाण (वय- २५, रा. मोरदरी, ता. हवेली), दादा बबन चव्हाण (वय ३६, रा. शिंदेवाडी ता. भोर), शुभम रोहिदास भंडलकर (वय – २३ रा. माहुर ता. पुरंदर), शंभु दत्तात्रय शितकल (वय – २२, माहुर ता. पुरंदर) व सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय -३०, रा. गुजर निंबाळकवाडी, ता. हवेली, भंगार व्यावसायिक) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी ३ आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगडावरील गाडीतळावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी बसविण्यात आलेले महागडे साहित्य चोरीला गेल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती. याबाबत वन विभागाने हवेली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना तातडीने एकत्रित तपास करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सिंहगडावर जाणाऱ्या खेडशिवापूर व डोणजे या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर काही संशयित फोन कॉल झाल्याचे तपास पथकाला आढळून आले. यावेळी सिंहगडावर एक खाद्यपदार्थ विक्रेताच या चोरीचा ‘मास्टर माईंड’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याने चोरलेले साडेसात लाखांचे साहित्य या चोरांनी केवळ पंधरा हजार रुपयांना एका भंगार व्यावसायिकाला विकल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच संबंधित भंगार व्यावसायिकालाही पोलीसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजित भुजबळ, राजू मोमिन, पोलीस नाईक गणेश धनवे, अमोल शेडगे, राजेंद्र मुंढे, बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत, दगडू विरकर, रजनीकांत खंडाळे यांचे पथकाने केली आहे.