मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या मॅनजेरने त्याची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमधल्या कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश ठाकरे असे फसवणूक केलेल्या मॅनेजरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश यादव याला क्रिकेटच्या निमित्ताने देशात आणि देशाबाहेर खेळण्यासाठी जावे लागते. त्यामुळे उमेश यादवने त्याचा मित्र असलेल्या शैलेश ठाकरे याला पत्रव्यवहार, इन्कम टॅक्स, बँकेचे तसेच इतर व्यवहाराकरिता पगारी मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते. पण शैलेश ठाकरे याने त्याचा गैरफायदा घेतला.
उमेश यादवने स्टेट बँक शाखेतील आपल्या खात्यात ४४ लाख रुपये ठेवले होते. पण शैलेशने ते पैसे परस्पर काढून घेतले, आणि स्वत:च्यान नावावर प्रॉपर्टी खरेदी केली. यानंतर उमेश यादवला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमेश यादवने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शैलेश ठाकरेविरोधात कलम ४०६, ४२० भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.