केज : केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर ६ जून २०२२ रोजी तहसील कार्यालयात सख्खा भाऊ मधुकर वाघ याने धारदार कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात सुदैवाने त्या बचावाल्या होत्या. ही घटना सहा महिन्यापूर्वीच घडली असतानाच आता, आशा वाघ यांच्या भावजयीने भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.२०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा वाघ या केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आहेत. त्या संजय गांधी निराधार योजनेचे कामकाज पाहतात. वाघ या शुक्रवारी दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकीने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून भावजय सुरेखा वाघ, तिचा भाऊ हरिदार महाले, तिची आई मुंजाबाई महाले, एक अनोखी महिला व वाहनचालक उतरला.
गाडीतून उतरल्यानंतर भाऊ हरिदास महाले याने आशा वाघ यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. काडी ओढण्यापूर्वीच वाघ यांनी हिसका देऊन पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या. लोक जमा होताच हल्लेखोर चारचाकी वाहनातून पळून गेले. हल्ल्यानंतर त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर याआधीही जीवघेणा हल्ला झाला होता. कौटुंबिक वादातून त्यांचा भाऊ मधुकर वाघ यांनी हल्ला केला होता. जून २०२२ मध्ये मधुकर वाघ यांनी कोयत्याने आशा यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले होते. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा कामावर रूजू झाल्या होत्या. पण आज त्यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला आहे.