पुणे : हडपसर येथील मंत्री मार्केटमध्ये चोरी करून पळ काढणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गणेश गौतम कोरडे (वय २२, रा. पंधरा नंबर चौक, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार साहिल कचरावत (रा. सातवनगर, हडपसर) व आणखी एक पळून गेला आहे. सतिश शिवाजी भिसे (वय ४८, रा. हडपसर गाव) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची मंत्री मार्केटमधील अविष्कार बिल्डिंगमध्ये मेन मुमेट कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. गुरुवारी (ता.१९) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील वेगवेगळ्या रंगाचे, कंपनीचे १ लाख २० हजार रुपयांचे २०० शर्ट त्यांनी चोरले. त्याचे गठ्ठे ते बाहेर घेऊन येत होते.
दरम्यान, चोरी होत असल्याचे नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविले. त्याबरोबर गस्तीवरील पोलीस तातडीने तेथे पोहचले. त्यानंतर दुकानातून बाहेर पडणार्या एक चोरट्याला पोलिसांनी पकडले. तर दोन चोरटे फरार झाले.
या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.