अजित जगताप
सातारा : पद आणि सत्ता बदलली की अधिकाऱ्यांच्या वागण्यात देखील मोठ्या प्रमाणात बदल होतो, सत्ता बदल झाल्यानंतर महत्वाचे प्रकल्प कसे दुर्लक्षित होतात, याचे ज्वलंत उदाहरण वडूज (ता. खटाव) येथे पाहण्यास मिळत आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव येथील वडूज पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे काम तीन वर्षांपूर्वी सुरु झाले होते. यावेळी देखील श्रेयवाद चांगलाच रंगाला होता. काम पूर्ण झाल्यानंतर २५ सप्टेंबर २०२१ रोजी नूतन वास्तूचे उदघाटन सध्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार होते. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक वजनदार नेते तसेच तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील हजार होते. यावेळी अजित पवार यांनी वास्तूंची पाहणी करताना कामातील अनेक चुका दाखवून देताना आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली व तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले.
इमारतीच्या पायरीपासून अनेक त्रुटी या वास्तूमध्ये आढळून आल्या होत्या. याबाबत अजित पवार यांनी सार्वजनिकरित्या सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढताना चुकांची दुरुस्ती करण्याची सूचना देखील केली होती. मात्र, ठेकेदार त्रुटी दूर करेल असे वाटले होते. यासाठी अनेकांनी वाट देखील पाहिली. परंतु अजून देखील या इमारतीतील त्रुटी तशाच असल्याचे आढळून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण झाल्याने संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार देखील आहे तेच काम रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन अधिकारी आला नसल्याने या विभागाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अनेक नेते थेट अजित पवार यांना भेटायला जातात परंतु त्यांनी केलेल्या सूचनांचा पाठपुरावा करताना कोणताच नेता दिसत नाही. अशा चुकांची जबाबदारी घेण्यासाठी बांधकाम विभागाचा अधिकारी देखील उपलब्ध नाही, त्यामुळे यासाठी न्यायालयात धाव घ्यायची का, अशी चर्चा अनेक ठिकाणी रंगताना दिसत आहे. शासनाच्या गलथान कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची मागणी आता जनतेतूनच येत आहे.