पिंपरी : महिला सक्षमीकरण, नवोदितांना संधी अशा संकल्पनेतून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘‘इंद्रायणी थडी’’ महोत्सव यावर्षी प्रत्येक आईला समर्पित करण्यात आला आहे. त्यासाठी जत्रेच्या बोधचिन्हामध्ये ‘मातृदेवो भव:’ असा उल्लेख करीत प्रत्येकाच्या आई प्रति समर्पण संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समन्वयक संजय पटनी यांनी दिली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली संखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘‘इंद्रायणी थडी-२०२३’’ महोत्सव भोसरी येथील गावजत्रा मैदानावर २५ ते २९ जानेवारी दरम्यान होणार आहे.
या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील खाद्य संस्कृती, ग्राम संस्कृती, हस्तकला, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती, ग्राम संस्कृती, पाटील वाडा, हास्य जत्रा, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, बालजत्रा, मॅजिक शो, फॅशन शो, नृत्य स्पर्धा आदी विविध विविध उपक्रम आणि कार्यक्रम होणार आहे. तब्बल १ हजार हून अधिक स्टॉल उभारण्यात येत आहेत.
‘आई – बाळ’ शिल्पाद्वारे कर्तज्ञताभाव..!
काही दिवसांपूर्वीच आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे निधन झाले. लांडगे कुटुंबियांच्या आधार हरपला. या पार्श्वभूमीवर संयोजकांनी यावर्षीचा महोत्सवाद्वारे ‘‘मातृ देवो भव:’’ असा संदेश देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ‘इंद्रायणी थडी-२०२३’ च्या लोगोमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच, जत्रेच्या ठिकाणी ‘‘आई-बाळ’’ असे शिल्प उभारण्यात येणार आहे. त्याद्वारे महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आई-वडीलांविषयी कृतज्ञता व आदरभाव निर्माण व्हावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महोत्सवाला भेट देताना आपल्या आई-वडीलांसोबत यावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.