पुणे : ओला आणि उबेरला लोहगाव विमानतळ परिसरात दिलेले पार्किंग बंद करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. या कंपन्यांना २६ जानेवारीपासून त्यांच्या कार मल्टिलेव्हल पार्किंग येथे उभ्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
लोहगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी खासगी गाड्यांबरोबरच दिवसभरात ओला-उबेरच्या खासगी प्रवासी वाहनांच्या अनेक फेऱ्या होतात. त्यामुळे विमानतळावर सातत्याने वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येत होते. ही कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने आता खासगी वाहनांप्रमाणेच ओला-उबेरच्या प्रवासी वाहनांसाठी मल्टिलेव्हल पार्किंगमध्येच जागा करून दिली जाणार आहे.
लोहगाव विमानतळ येथे ओला आणि उबेर या दोन्ही कंपन्यांची जवळपास तीन हजार वाहने दिवसभरात येतात. विमानतळ प्रशासनाने या कंपन्यांकडून शुल्क घेऊन त्यांना परिसरात जागा दिली होती. आता त्यांच्यासोबतचा करार संपल्यानंतर २६ जानेवारीपासून त्यांना आवारात गाड्या उभ्या न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याऐवजी एरोमॉलच्या पार्किंगमध्ये त्यांना त्यांच्या गाड्या उभ्या कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विमानतळ प्रशासनाने ओला आणि उबेर चालकांना दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र ‘पार्किंग व्यवस्था’ केली आहे. त्यामुळे विमानतळ परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. प्रवाशांना थेट टर्मिनलवरून फूट ब्रीजवरून पार्किंगमध्ये जाता येणार आहे; तसेच पार्किंगमध्ये उतरल्यानंतर टर्मिनलवर जाता येणार आहे.
लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांनी ओला आणि उबेरचे ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर बऱ्याच वेळा ही वाहने काही अंतरावर असताना बुकिंग स्वीकारत होती. मात्र, त्यांना विमानतळ परिसरात येण्यास खूपच वेळ लागत होता. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ वेटिंगवर राहावे लागत होते.
दरम्यान, आता प्रवाशांनी कारचे ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ते थेट मल्टिलेव्हल पार्किंगमध्ये जातील. त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेला क्रमांक दाखविल्यानंतर उपलब्ध असलेली कार त्यांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘वेटिंग’वर उभे राहवे लागणार नाही.