लोणी काळभोर : लोणी काळभोर, अष्टापूरसह हवेली तालुक्यात नव्याने १५ मंडल अधिकारी कार्यालये लवकरच कार्यन्वीत होणार आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तहसिलदार तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात महसूल विभागात नव्याने ३३१ तलाठी सजा व ५५ मंडल अधिकारी सजा तयार करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार हवेली तालुक्यात नव्याने १५ मंडल अधिकारी सजाची निर्मिती होणार आहे. तर यापूर्वी हवेली तालुक्यात ८ मंडलाधिकारी सजा होते. आता त्यामध्ये नव्याने १५ सजाची वाढ होणार असल्याने हवेलीत एकूण २३ मंडल अधिकारी कार्यालये कार्यन्वीत होणार आहेत.
सद्यस्थितीत हवेली तालुक्यात हडपसर, थेऊर, उरुळी कांचन, वाघोली,कळस, खडकवासला,खेड शिवापूर व कोथरूड अशी आठ मंडल अधिकारी कार्यालये आहेत. त्यामध्ये नव्याने उरुळी देवाची, महमंदवाडी, फुरसुंगी, कात्रज,कोंढवा, आंबेगाव बुद्रुक, धायरी, डोणजे, खानापूर, शिवणे, कोंढवे धावडे, अष्टापूर, लोणी काळभोर, खराडी व लोणीकंद अशी १५ मंडल अधिकारी कार्यालये होणार आहेत.
लोणी काळभोर मंडळ अधिकारी कार्यालयात नव्याने लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबा, तरडे या तलाठी सजाचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे थेऊर मंडल अधिकारी कार्यालय अंतर्गत थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी बुद्रुक, महादेवनगर व मोरे वस्ती या तलाठी सजाचा समावेश राहणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात आस्थापनेवरील नव्याने निर्माण झालेल्या ५५ मंडल अधिकारी पदे तहसिलदार तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना कार्यन्वीत करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
याबाबत बोलताना हवेलीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर म्हणाले कि, प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वात प्रथम स्वागत करतो. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर व पंचक्रोशीत दैनंदिन लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वाढत आहे. खातेदार शेतकरी व नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी दिरंगाई लागत होती. मात्र आता या नव्याने तयार होणाऱ्या तालुक्यातील १५ मंडल अधिकारी कार्यालयामुळे खातेदार शेतकरी बांधवाच्या फेरफार वरील तक्रारी निवारणीचे कामकाज विनाविलंब व फेरफार नोंदीसुद्धा वेळेवर निर्गत होतील. अशी अपेक्षा आहे.