पुणे : पन्नास लाखांच्या खंडणीसाठी मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिकांचे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून अपहरण केलेल्या तिघांचीही सुटका श्रीगोंदा येथून काही तासात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यूनर आणि क्रेटा कार जप्त केली आहे.
प्रवीण शिखरे, विजय खराडे, विशाल मदने (रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी श्रीगोंदा येथील एका लॉजमधून आरोपींना अटक करुन तीन बाधंकाम व्यावसायिकांची सुखरुप सुटका केली. अपहरण झालेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या भावाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तीन बांधकाम व्यावसायिक हे पुण्यात कामानिमित्त आले होते. यावेळी अज्ञात तिघांनी पन्नास लाखांच्या खंडणीसाठी पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून अपहरण केले. यानंतर आरोपींनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्यांच्या भावाशी संपर्क साधला. तिघांना सोडवायचे असेल तर ५० लाख रुपये द्या असे आरोपींनी सांगितले. तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करुन मारहाण करीत असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली.
दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपासावरुन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने सापळा रचून एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपीचे पाच ते सहा साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सुनील पंधरक, अजय वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, विशाल मोहिते, कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव, अविनाश लोहोटे व गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांनी केली.