दीपक खिलारे
इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास मांजरी बु. येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) चा गळीत हंगाम सन २०२१-२२ साठीचा मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शुक्रवारी (ता. १३) जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ मांजरी बु., पुणे येथे २१ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने सदर पुरस्काराची आज घोषणा केली. नीरा-भीमा कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक पॅरामिटर मुळे मध्य विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. नीरा भीमा कारखान्याने केलेल्या गाळप क्षमतेचा ११७.८६ टक्के वापर, रिड्यूसड मिल एक्स्ट्रक्शन ९५.४९ टक्के, साखर तयार करण्यासाठी बगॅस वापर १७.२५ टक्के आदी कार्यक्षमता वैशिष्ट्यांमुळे कारखान्यास सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या कौतुकास्पद कामगिरीबद्दल कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. नीरा-भीमा कारखान्याला यापूर्वी राज्य व देशपातळीवरील एकूण १२ पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहितीही याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी दिली.
यावेळी संचालक विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.