शिरुर : शिरुर तालुक्यात गौणखणिज माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौणखणिज माफियांची आता तर इथपर्यंत मजल पोहचली आहे कि, चक्क कारवाई करणाऱ्यासाठी गेलेल्या मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील तलाठ्याच्या कारला मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.११) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तलाठयाच्या गाडीच्या तीन चार पलट्या झाल्या असून सुदैवाने एअरबॅग ओपन झाल्याने ते बचावले आहेत.
दिपक गांगर्डे असे जखमी झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर शिरुर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात चालक व इतर दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यामध्ये होत असलेल्या अनाधिकृत गौण उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी शिरुर तहसिल कार्यालयामार्फत पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर पथक न्हावरा ते तळेगाव ढमढेरे रस्त्याने खाजगी वाहनाने फिरत असताना त्यांना मौजे दहीवडी गावचे हद्दीत मुरुमाची वाहतुक करीत असणारा हायवा (के. एम. एच. 12 यू.एम.0004) हा तळेगाव ढमढेरे बाजूकडे जाताना दिसला.
पथकाने खाजगी वाहनाने त्या हायवा ट्रकचा पाठलाग करून शासकीय धान्य गोदाम तळेगाव ढमढेरेचे गेटजवळ हायवा ट्रक थांबविला. आणि हायवाचे वर चढून पाठीमागिल हौदाची पाहणी केली असता हौदयात अंदाजे ६ ब्रास मुरुम असल्याचे निदर्शनातआले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी चालकाला तुमच्याकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना आहे काय?अशी विचारणा केली असता सदर ड्रायव्हरने परवाना नसल्याचे सांगितले.तेंव्हा पथकाने त्यास हायवा ट्रक शासकीय गोदामात लावण्यास सांगितले.
त्यानंतर हायवा ट्रकचे ड्रायव्हरने केबीनचा दरवाजा आतून लॉक करुन घेतला व दोन्ही बाजूच्या काचा बंद केल्या. ट्रक ट्रायव्हर याने ट्रकचे समोर उभे असलेल्या पथकातील स्टाफच्या अंगावर हायवा ट्रक रेस करुन घेवून लागला. सर्व स्टाफ त्वरित हायवा ट्रकचे समोरुन जीव वाचविण्याकरीता बाजूला झाले. त्यावेळी हायवा ट्रक ड्रायव्हर तळेगाव ते आष्टापुर रोडने आष्टापुर बाजूकडे भरधाव वेगात ट्रक घेवून गेला.
दरम्यान, दिपक गांगर्डे यांनी त्यांच्या टाटा टीगरने (गाडी नंबर एम. एच. 16 सी. वाय. 8833) साधारण एक ते दीड किलोमीटर ट्रकचा पाठलाग केला. तेव्हा गांगर्डे यांची गाडी ही ट्रकच्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करीत असताना, ट्रक ड्रायव्हरने तलाठयाच्या गाडीच्या पाठीमागून ठोसर दिली.ठोसर दिल्यानंतर तलाठ्याची गाडी रोडवरून खाली उतरून शेजारी असलेल्या शेतात तीन चार पलट्या घेवुन चक्काचूर झाली. सुदैवाने गाडीतील दोन्ही एअरबॅग उघडल्याने तलाठी दिपक गांगर्डे बचावले आहेत.