पुणे : एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.
दरम्यान, यावेळी काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात. त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी आमची राज्य सरकार आणि आयोगाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.