पुणे : पुण्यातील ९ वर्षाच्या ज्ञेय कुलकर्णीने ४ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवून भीमपराक्रम केला आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिली येथे येत्या प्रजासत्ताकदिनी पुरस्कार दिला जाणार आहे.
ज्ञेय कुलकर्णी हा बावधन येथे राहणारा असून तो पुण्यातील संस्कृती स्कूल भुकूम कॅम्पस शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे. या ९ वर्षाच्या चिमुकल्याने चार वर्षाच्या लहान मुलाचे प्राण वाचवून शौर्याची कामगिरी केली आहे.
बिबवेवाडी परिसरातील पर्पल कॅसल सोसायटीमध्ये एक चार वर्षांचा मुलगा आपल्या बहिणीसोबत खेळत होता. ते दोघेही सीसॉवर खेळत होते. सीसॉजवळ असलेल्या इलेक्ट्रिकच्या खांबातील वीजप्रवाह त्या सीसॉमध्ये आल्यामुळे हा मुलगा त्याला चिकटला. त्या मुलाची बहिण मदतीसाठी आरडाओरडा करत असताना तेथून जात असलेल्या ज्ञेयने प्रसंगावधान राखून त्या मुलाला धक्का देत सीसॉवरून खाली पाडले. त्यामुळे विजेच्या झटक्यातून तो बचावला.
ज्ञेयने सांगितले की, ‘‘आई आणि आजी मला नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याचे सांगतात, त्यामुळे मदत करायला आवडते. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मी पायात रबरचे स्लीपर घातले होते. त्यामुळे मला विजेचा झटका बसणार नाही. हे मला आई व आजीने शिकविले होते.”त्यानंतर मी धावत त्या मुलाकडे गेलो. त्या मुलाचे प्राण वाचवून मला ही आनंद झाला.
दरम्यान, या कामगिरीसाठी ज्ञेयला शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या शूर कामगिरीसाठी ज्ञेयला कौतुकाची थाप मिळत असून इतरांना देखील त्याच्या या कृतीतून प्रेरणा मिळत आहे.
हा राष्ट्रीय पुरस्कार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रपती, पंतप्रधान आदींच्या उपस्थित पार पडेल.