वाघोली : सर्वसामान्य कुटुंबातील मित्राची केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड होताच त्यांच्या मित्रांनी त्यांना सुमारे ४६ लाख रुपये किमतीची आलिशान कार भेट देत अनोखी मित्रता जपली आहे. मित्रांच्या या अनोख्या भेटीने सरपंच हि भारावून गेले.
दत्तात्रय मारुती हरगुडे असे केसनंदच्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव आहे. केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रय हरगुडे तर उपसरपंच पदी सुरेखा सुभाष बांगर यांची बुधवारी (ता. ११) बिनविरोध निवड झाली.
सरपंच सचिन हरगुडे व उपसरपंच अक्षदा हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. आज झालेल्या सरपंचपद निवडणुकीत सरपंच पदासाठी दत्तात्रय हरगुडे व उपसरपंच पदासाठी सुरेखा बांगर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, सरपंच नावाचा भला मोठा हार बनविण्यात आला होता. क्रेनच्या साह्याने तो उचलून धरण्यात आला. मित्र व समर्थक यांनी जल्लोष करीत भंडाऱ्याची उधळण केली. ग्रामसेवक प्रदीप ढवळे, अशोक शिंदे, बगाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी सदस्य, ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.