फिजा शेख
दौंड : शिवसेनेच खासदार संजय राऊत हे आमदार, खासदार सोडून जाण्याच्या भीतीने सरकार पडण्याच्या वल्गना करतात. राऊत हे जेलमध्ये राहून आल्यापासून त्यांची भाषाही तशीच झाली आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
दौंड कृषी महोत्सव २०२३ च्या उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रत्राकारांशी संवास साधताना वरील टीका बावनकुळे यांनी केली आहे. तसेच कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्यांवर नाव न घेता अप्रत्यक्ष टीकादेखील केली आहे. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, गणेश भेगडे, बाबाराजे जाधव, राहुल शेवाळे, दादा फराटे, जालिंदर कामठे, माउली शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, केंद्राच्या शेती संदर्भातील ४९ योजनांमधील १२ योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळवून देतात. विकास केला, अशा वल्गना करणाऱ्यांनी ५० वर्षे सत्ता उपभोगली. त्यांनी कोणावर उपकार केले नाहीत. सत्ता हे साध्य नसून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे भल करण्याचे साधन आहे.सत्तेचा वापर कंत्राटदारांसाठी झाला. एकट्या बारामतीचा विकास म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा विकास होत नाही.
समाजातील एकाचे अश्रू पुसता आले तरी मोठे काम झाले, असे मी समजतो. मागचे १५ वर्षे विरोधकांनी सत्ता उपभोगली. त्यांना पुण्यात पूल बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ट्विटच्या माध्यमातून सांगावे लागतय, मग तुम्ही काय केले अशी टीका बावनकुळे यांनी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
विकासाचा भ्रम निर्माण केला जातोय. ७ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात ४ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती भाजप व मित्रपक्षांच्या निवडून आल्या आहेत. असेही बावनकुळे यांनी यावेळी बोलून दाखविले आहे.
यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील म्हणाले, शेतकरी जगला पाहिजे, स्वावलंबी झाला पाहिजे. जे शेतकऱ्यांना वेळ देत नव्हते ते आता वाड्या-वस्त्यांपर्यंत शेतकऱ्यांकडे फिरत आहेत. बारामती कोणाला आंदण दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या विकास प्रवाहात बारामतीचे शेतकरी आणि नागरिक सामील होणार आहेत.
दरम्यान, प्रतिभावंत शेतकरी कांतिलाल रणदिवे, महेश फरगडे, गणेश फरगडे, उषा काळे, दत्तात्रय जठार,सचिन चंद्रकांत थोरात, शेखर आणि दीपक शितोळे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी उद्योजगता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संदीप जगताप या शेतकऱ्याने शासनाच्या योजनेसंदर्भात आपले मत व्यक्त केले.
तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव काळे यांनी केले.