उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून हडपसर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना हांडेवाडी व मांजरी दरम्यान रेल्वे मार्गावर १४ जुलै २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशिल डमरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तारामती अशोक सूर्यवंशी (वय ३८, रा. सय्यदनगर, मुळ परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. विक्रांत दशरथ जगताप (वय ३८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी ते हांडेवाडी दरम्यान रेल्वे मार्गावर एक महिला जखमी अवस्थेत आढळून आली होती. तिला ससून रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता तारामती सूर्यवंशी ही विवाहानंतर २०१६ पासून पतीला सोडून विक्रांत जगताप याच्यासोबत रहात होती.
दरम्यान, तारामती हिस विक्रांत मारहाण करत असे. तिला उपाशी ठेवत होता. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विक्रांत जगताप याला ५ महिन्यांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.