जनार्दन दांडगे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे- सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण, व दळणवळणाच्या वाढलेल्या सुविधांमुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या भागात परराज्यातून रोजीरोटीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत असल्याने फसवणूक, गुन्हेगारी अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी घरमालकांनी भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
परिसरात परराज्यातून नागरिक स्थायिक होत आहेत. यातील बहुतांश नागरिक, नोकरी व व्यवसायासाठी येतात. जागा भाडे तत्वावर घेऊन वास्तव्य करतात. मात्र काही अपप्रवृत्तीचे नागरिक भाडेतत्वावर राहून गुन्हा करतात आणि निघून जातात. त्यामुळे जागा मालकांनी भाडेकरू ठेवताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल. भाडेकरूंची नोंद पोलिस ठाण्यात करणे बंधनकारक असून अद्याप नागरिकांनी याला फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी भाडेकरूची नोंद फायदेशिर ठरणार आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरटी, फुस लावून पळविणे, हरवले आहे, भाडे बुडविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मोबाईल चोरी या सारखे प्रकार घडत आहेत.. यातील काही आरोपी हे परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून येतात. या परिसरात भाडेतत्वावर राहून गुन्हा करतात ही बाब समोर आल्याने या पूर्व हवेलीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर मोठ्या कंपन्या, नर्सरी व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे, शौक्षणिक संस्था असल्याने या परीसरात मोठ्या प्रमाणात घरे भाड्याने दिली जातात. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच मजूर व लहान लहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याबरोबर या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकही राहतात. ते दिवसभर फिरून पहाणी करतात. रात्री दुचाकी चोरणे, घरफोडी, मोबाईल चोरीचे प्रकार करतात. त्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात. ज्यावेळी त्यांना अटक होते. त्यावेळी या परिसरात तो भाडेतत्वावर राहत असल्याचे पुढे येते. यासाठी या परिसरातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन भाडेकरूंची चौकशी करणे आवश्यक आहे.
दौंड, शिरूर व पुरंदर तालुक्यासह परगावाहून आलेले अनेक कामगार पुणे शहर व परिसरात रोजंदारीसाठी जातात. मात्र पुणे-दौंड रेल्वेमार्ग व पुणे-सोलापूर महामार्ग या सेवांमुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर, दौंड तालुक्यातील केडगाव, यवत व पाटस या गावांमध्ये त्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या पुणे-दौंड रेल्वेमार्गवर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरु आहे.
दरम्यान, मागील महिन्यात हुबेहूब बनावट ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत त्याने एक भाड्याने खोली घेतली होती. व याच भाड्याने घेतलेल्या खोलीत जवळपास ६ लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे म्हणाले, “भाडेकरुविषयी माहिती देण्याचा फॉर्म पोलीस ठाण्यात उपलब्ध आहे. पोलिसांकडून आवाहन करण्यात येते कि, घर भाड्याने देताना घरमालकाने भाडेकरूची संपूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या घरमालकांनी लवकरात लवकर आपल्या भाडेकरुविषयी माहिती पोलीस ठाण्यात देण्यात यावी. तसेच नोंदणी न करणाऱ्यावर घरमालकांवर पोलीस कारवाई करणार आहेत.”