पुणे : पुण्यातील ७८ वर्षीय जेष्ठ नागरिक श्रीकांत आडकर यांनी जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्यांच्या जिद्दीला व त्यांनी मिळविलेल्या यशाला सर्व स्तरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
पुण्यात जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ५० किलो वजन उचलण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्रीकांत आडकर यांनी वजन उचलून एक तरुणांना लाजवेल असा विक्रम केला आहे. त्यामुळे त्यांच्या या फिटनेसची चर्चा सध्या संपूर्ण शहरात होत आहे.
यावेळी बोलताना श्रीकांत आडकर म्हणाले कि, सातत्य आणि शिस्त माणसाने बाळगली तर माणूस कोणतेही यश प्राप्त करु शकतो. मला लहानपणापासून खेळाची आवड होती. त्यामुळे मी अजूनही नियमीतपणे व्यायाम करतो. मी कर्वेनगर येथील सोमण क्लबच्या राजहंस मेहंदळे यांच्याकडे पॉवरलिफ्टिंगचा व्यायाम करतो. त्यांनीच मला डेडलिफ्टचीदेखील तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार मी सराव सुरु केला होता. वाढत्या वयाचा मी कधीही विचार करत नाही मला वाटेल ते मी नेहमीच कायम करतो.
दरम्यान, श्रीकांत आडकर यांना वयाच्या ७८ व्या वर्षी पॉवरलिफ्टिंग करणे आव्हान होते. कारण वाढत्या वयामुळे शरीरात खूप मोठे बदल होत असतात. त्याचाबरोबर हाडेदेखील ठिसूळ होतात. तसेच मणक्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी ट्रेनरने रोज सराव करुन घेऊन आरोग्याचाही अंदाज आला. तसेच सरावाचा योग्य आढावा घेत होते. ट्रेनरनी बारीकसारीक गोष्टींवर लक्ष दिले. त्यामुळेच मी स्पर्धेत उतरलो आणि जिंकलो देखील, असे आडकर यांनी विजयानंतर बोलताना सांगितले.
श्रीकांत आडकर यांचे वडील एक पोलिस अधिकारी होते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाने स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे, असे ते नेहमी सांगायचे. त्यांच्यामुळे आम्हाला शिस्त लागली. नियमित व्यायाम केल्याने मला मदत झाली. जर तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेवले आणि नियमित व्यायाम केला तर वयाच्या ८० व्या वर्षीही तुम्ही तंदुरुस्त राहू शकता, असे श्रीकांत आडकर यांनी सांगितले.