पुणे : “तुमची हिंदूंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का” अशी धमकी देत पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने रेस्टॉरंटची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना भवानी पेठ परिसरात घडली आहे. गुरुवारी (ता.०५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
निशा नावाच्या रेस्टॉरंटची थोडफोड केली. ही तोडफोड का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट असून रेस्टॉरंट मालक मोनिष शशिकांत म्हेत्रे (वय ३९, रा. ३८८ भवानी पेठ, फ्लॅट नं. १०५ पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंट मालक म्हेत्रे हे ज्या इमारतीमध्ये राहतात त्याच इमारतीच्या तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे निशा नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट खूप जुने असून रेस्टॉरंटचा कारभार मोनिष व त्यांचा मोठा भाऊ शैलेश शशिकांत म्हेत्रे सांभाळतात. ५ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे मोनिष यांनी रेस्टॉरंट उघडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये गर्दी कमी असल्याने कामगार संतोष आणि आझीम हे रेस्टॉरंटमध्ये काम करत होते.
मोनिष हे रेस्टॉरंटसमोर पार्किंगच्या ठिकाणी बसले होते. त्यावेळी दुचाकीवर पाच ते सहा मुल आले त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्यांच्या हातात लोखंडी कोयते, हॉकी आणि रॉड असे हत्यार होते. ते रेस्टॉरंटमध्ये गेले त्यावेळी त्यांना मालक मोनिष हे दिसले नसल्याने आरोपी परत बाहेर आले आणि त्यांनी मोनिष यांना पार्किंगमध्ये पाहून त्यातील तिघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शिवीगाळ केली.
दरम्यान, आरोपी म्हणाले की, “तुमची हिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? त्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटची तोडफोड केली आणि तिथून निघून गेले. तोडफोड करणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध आणि अधिक तपास लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिलीप कांबळे करत आहेत.