हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : समाजामध्ये बालगुन्हेगारी वाढण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर कारणीभूत ठरत असल्याने मुलांच्या मोबाईल वापराबाबत शाळा व पालकांनी समुपदेशकाची भूमिका बजावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन “प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बाप्पू काळभोर यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी भाषेतील आद्य पत्रकार, ‘दर्पण’ या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात करणारे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी राजेंद्र उर्फ बाप्पुसाहेब काळभोर बोलत होते.
यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, विजय काळभोर, शरद पुजारी, बापूसाहेब धुमाळ, पुणे प्राईम न्यूजचे वरिष्ठ पत्रकार विशाल कदम, दिगंबर जोगदंड, विजय रणदिवे, राम भंडारी, दिपक गिरी, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, संस्थेच्या व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, प्रशासक प्रियंका सुभेदार, शिक्षिका पायल बोळे, मनीषा सुपेकर, प्रा. दीपक शितोळे, विकास धुमाळ आदी उपस्थित होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी मंजिरी बोळे हिने वृत्तनिवेदिकेची भूमिका दाखविणारा एकपात्री प्रसंग सादर केला.
समाजामधील उणीवांवर बोट ठेवणारे आणि आदर्शांना बळ देणारे पत्रकार हा लोक कल्याणकारी राज्यातील एक महत्त्वाचा स्तंभ असतो. पत्रकारितेतील आदर्शांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी तसेच पत्रकारितेतील आजवरच्या वाटचालीचा गौरव व्हावा या उद्देशाने रेनबो स्कूलच्या वतीने समाजातील गुणवंत पत्रकारांना “आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान” देऊन गौरविण्यात आले.
बाप्पुसाहेब काळभोर म्हणाले, “आजही वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सत्ताधाऱ्यांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवून समस्या सोडवण्याचे काम करतात. वृत्तपत्रांद्वारे समाजप्रबोधन व समाजजागृतीही केली जात आहे. अनेक वृत्तपत्रांतून वाचकांचे मनोरंजनही केले जात आहे. वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आहे. वृत्तपत्राचा आवाज हा कधीच दाबला जाऊ शकत नाही.”
शाळेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर म्हणाले, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आहे. वृत्तपत्राचा आवाज हा कधीच दाबला जाऊ शकत नाही.वृत्तपत्रात जे छापले आहे ते सत्य आहे, पवित्र आहे, अशी दृढ भावना आजही लोकांमध्ये आहे. त्यामुळे देशात माध्यमक्षेत्रात उलथापालथ झाली असली तरी वृत्तपत्रांबद्दल आदर व आब अजूनही लोकांमध्ये कायम आहे.
विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये पत्रकारिता क्षेत्र निवडून एक वेगळ्या अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असेही नितीन काळभोर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनीषा सुपेकर यांनी केले तर आभार विकास धुमाळ यांनी मानले.