पुणे : गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले याच्याशी झालेल्या ओळखीतून १० लाख घेतले होते. त्याबदल्यात २१ लाख परत करून देखील अजून २० लाख रुपयांचे व्याजाची मागणी करण्यात येत आहे. मात्र हे पैसे दिले नाहीत, तर आम्ही तुझे हात कापून टाकू अशी धमकी दिल्या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार पप्पू कुडले याच्या विरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी येरवड्यातील गुंजन चौकात घडली.
याप्रकरणी सांगवीतील एका ३८ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल ऊर्फ पप्पु कुडले (रा. दत्तवाडी,) बांदल, बालाजी ऊर्फ भैय्या कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फसवणुकीच्या गुन्ह्यात फिर्यादीला अटक झाली होती. त्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. तेथे गजा मारणे टोळीतील गुन्हेगार पप्पु कुडले याच्याशी त्याची २ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी हे सर्व जण गजा मारणे टोळीतील गुन्हेगार आहेत. निलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे याचा खून केल्याप्रकरणी गजा मारणेसह पप्पु कुडले, मंदार बांदल अशा २२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यातून फेबुवारी २०२१ मध्ये सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.
फिर्यादीने कारागृहातून सुटल्यानंतर कुडले याच्याकडून १० लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादीने २१ लाख रुपये परत दिले होते. तरीही तो आणखी २० लाख रुपयांचे व्याज देण्याची मागणी करीत होता. फिर्यादी व त्यांचे मित्र हे गाडीतून जात असताना ५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता त्या टोळीने त्यांना गुंजन चौकात अडवले. त्यांना व मित्रांना हाताने मारहाण करुन जबरदस्तीने गाडीत बसवले.
दरम्यान, फिर्यादी यांच्या खिशातील ८२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना गाडीतून खाली उतरवून तू जर मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापून अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.