सोलापूर : पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला १० वर्ष सक्त मजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सोलापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठाविली आहे. हे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी दिले.
टाकळी सिकंदरचे तत्कालीन सरपंच नवनाथ तळुशीदास अनुसे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्यांची नावे आहे. तर तत्कालीन ग्रामपंचायतचा वसुली अधिकारी मोहम्मद कचरुद्दीन पठाण यास ५ वर्षाची सक्तमजुरी व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाचा मंजूर घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी व मोहोळ समितीला अहवाल पाठवण्यासाठी तक्रारदाराकडून आरोपींनी २५ हजार रुपये लाच मागितली होती. याप्रकरणी एका तक्रारदाराने २०१२ ला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचला असता, तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी नवनाथ अनुसे व गोपीचंद गवळी यांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा खटला सोलापूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकील अॅड. ए.जी. कुलकर्णी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वरील आरोपींना सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी दिले.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. ए.जी. कुलकर्णी यांना लाचलुचपत विभागातर्फे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, सहायक पोलीस निरीक्षक सायबण्णा कोळी आणि पोलीस नाईक श्रीराम घुगे यांची मदत मिळाली.