विशाल कदम
जिंती : जिंती (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रमेश संभाजी धेंडे हे ८-२ अशा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
जिंती ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच सुनिता ओंभासे यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी (ता.५) पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या साविताराजे भोसले यांच्या श्रीमंत मकाई ग्रामविकास पॅनेलच्या वतीने रमेश धेंडे यांनी तर ॲड. नितीनराजे भोसले यांच्या कै. बॉबीराजे भोसले परिवर्तन पॅनलच्या वतीने उमेश शेलार यांनी अर्ज केला होता.
उपसरपंच पदाच्या झालेल्या चुरशीच्या निवडणूक प्रक्रियेत रमेश धेंडे यांना ८ मते तर उमेश शेलार यांना २ मते पडली. या निवडणुकीत धेंडे यांनी ६ मतांच्या फरकाने बाजी मारली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी उपसरपंचपदी रमेश धेंडे यांची निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामविकास आधिकारी राजू मोतीकर यांनी निवडणुकीचे शासकीय कामकाज पाहिले.
दरम्यान, उपसरपंचपदी रमेश धेंडे यांची निवड होताच, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून आनंद साजरा केला. तर जिल्हा परिषदेच्या सदस्या साविताराजे भोसले, सरपंच सुनिता ओंभासे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रमेश धेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कीर्तीमालिनी राजेभोसले, जनाबाई वारगड, पल्लवी धेंडे, भारती धेंडे, लता पोटे, सागर भोसले, माजी उपसरपंच वाल्मिक वाघमोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश घोरपडे, शंकर केसकर,अमर धेंडे, गजानन पोटे, नाना वाघमोडे, विनोद शेलार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या साविताराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. तसेच गावात विकासकामे करित असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच रमेश धेंडे यांनी केले आहे.