लहू चव्हाण
पाचगणी : स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून आजच्या आधुनिक काळात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व विकास करणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले.
पाचगणी येथील कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर पाचगणी -महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी चोथे बोलत होते. यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, राजपुरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी भिलारे, हिलरेंज हायस्कूलचे मुख्याध्यापक जतीन भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना अष्टपैलू बनवत असताना आवश्यक असणारे सर्व खेळ या माध्यमातून उपलब्ध व्हावेत हाच आजच्या क्रीडा महोत्सवाचा आणि स्पर्धांचा उद्देश असल्याचे चोथे पुढे बोलताना म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक ज्ञान महत्त्वाचे तेवढेच क्रिया कौशल्य हे सुद्धा महत्वाचे असते. अभ्यासात आम्ही विद्यार्थ्यांना निपुण करतोय पण या मातीशी इमान राखणारा जो खेळ आहे तो खऱ्या अर्थाने मुलांना चांगल्या पद्धतीने खेळता आला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असणाऱ्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, समूह गीताच्या स्पर्धाही आम्ही पुढच्या आठवड्यात सुरू करणार आहोत, असे गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांनी जाहीर केले.
यावेळी गिरीश दापकेकर, तेजस्विनी भिलारे, जतीन भिलारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या क्रीडा स्पर्धां दि.५ ते ११ जानेवारी दरम्यान दोन्ही नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये होणार आहेत. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, ध्वजारोहण करून ज्योत पेटवून क्रीडा शपथ घेण्यात आली.सुत्रसंचलन व आभार संतोष शिंदे यांनी मानले.