पुणे : दहीहंडी आणि गणेशोत्सव कोणत्याही कोरोना निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रातील हे मोठे सण हे साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र या सणांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी होणाऱ्या सार्वजनिक गणोशोत्सव, मोहरम, दहीहंडी या सणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते.
यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. दहीहंडी, गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्याचे निर्देश शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना दिलेल्या आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सव, दहीहंडीसह इतर सण व्यवस्थित पार पाडले जावेत यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत व्हाव्यात यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीनं परवानग्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही क्लिष्ट अटीशर्ती नसणार, यासाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही, याची सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी, नियमांचे पालन करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. पण नियमांबाबत बागुलबुवा निर्माण केला जाऊ नये अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईत जी नियमावली आहे त्याप्रमाणं राज्यातही व्हाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोविडकाळात गणेश मुर्तींच्या उंचीवर मर्यादा आणली गेली होती ती मर्यादा हटवण्यात आली आहे.