लोणी काळभोर : शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, पुणे-पंढरपूर मार्गावरील दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत स्पोर्टस बाईकने धडक दिल्याने ४ वर्षाच्या चिमुकल्यासह आजोबांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.४) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी स्पोर्टस बाईक पेटवून दिली तर हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे.
गोकुळ धोंडीबा झेंडे (वय-६३) आणि पद्मनाभ झेंडे (वय-४) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वार यशवर्धन मगदूम याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ झेंडे हे नातू पद्मनाभ याला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, त्यांची दुचाकी पुणे-पंढरपूर मार्गावरील सासवड रस्त्यावरही दिवे ग्रामपंचायत हद्दीत आली असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने (क्रमांक एम.एच.१२ यु.एक्स.६०५५) जोरात धडक दिली. या अपघातात नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र आजोबांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी स्पोर्टस बाईक पेटवून दिली आहे.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना शांत करत तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वार यशवर्धन मगदूम याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या घटनेने झेंडे कुटुंबासह दिवे परिसरात देखील शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर महामार्गाच्या परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.